छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील मुख्य रस्ते, चौका-चौकात बेकायदा होर्डिंग लावून शहराचे विद्रुपीकरण करण्याचा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. शनिवारी (दि.२१) मुकुंदवाडीत महापालिकेच्या स्वच्छता कामगाराचा बळी अनधिकृत होर्डिंगने घेतल्यानंतर प्रशासनाला जाग आली. शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करून संबंधितांवर फौजदारी व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला. महापालिकेतर्फे वारंवार अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली जाते; पण न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले जाते. अनधिकृत होर्डिंग लावणारे व ज्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत, अशांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. असे असताना शहरात अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे. त्यात शनिवारी सफाई कर्मचार्याचा बळी गेला. त्यानंतर महापौरांसह आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा अतिक्रमण विभाग नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, उपायुक्त सविता सोनवणे यांच्यासह इतरांनी तातडीने घटनास्थळी तसेच मिनी घाटी रुग्णालयात भेट दिली. त्यानंतर महापौर, आयुक्तांनी शहरातील अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात संताप व्यक्त करत आता कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा दिला.












